नाशिक (प्रतिनिधी): भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना दिंडोरी नाका येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संजय बाबूराव तायडे (रा. उदय कॉलनी, रा. पंचवटी) हे राजाराम बाबूराव अहिरराव (वय ६०, रा. विद्यानगर, मखमलाबाद रोड, नाशिक) यांच्या मोटारसायकलीवर पाठीमागे बसून पेठ नाक्याकडून निमाणीकडे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जात होते.
ते दिंडोरी नाका येथे मोटारसायकलीने आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एमएच ०६ एक्यू ३४६२ या क्रमांकाच्या टाटा हायवा ट्रकवरील चालकाने मोटारसायकलीस धडक दिली. त्यात मोटारसायकलस्वार राजाराम अहिरराव हे मोटारसायकलीसह ट्रकच्या चाकाखाली आले.
त्यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलीचे नुकसान झाले असून, गर्दीचा फायदा घेऊन अपघाताच्या ठिकाणाहून अनोळखी ट्रकचालक पळून गेला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.