नाशिक। दि. ६ जानेवारी २०२५: सिडको परिसरात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकी चालक व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजेदरम्यान स्वॅन कुल झोन समोरच्या सर्व्हिस रोडवर, हॉटेल आदित्य मटन भाकरीजवळ सिडको येथे मेघा विश्वास कुलकर्णी (वय ५६, रा. पन्ना हाइट्स, सह्याद्री नगर, सिडको) या पायी रस्ता ओलांडत होत्या.
त्याचवेळी पाथर्डी फाटा बाजूकडून सर्व्हिस रोडने राणेनगर बोगद्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ४१ बीएफ ३६२५ वरील चालक समाधान शंकर गांगुर्डे (वय २३, रा. शुभम पार्क, उत्तम नगर, सिडको) आणि त्याचा मित्र योगेश गुलाब चौधरी (वय २०, रा. श्रीराम कॉलनी, गणेश चौक, सिडको) यांनी कुलकर्णी यांना उजव्या बाजूने जोराची धडक दिली.
या अपघातात मेघा कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मृत महिलेचे पती विश्वास कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात संशयित समाधान गांगुर्डे आणि योगेश चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १७/२०२५)
![]()


