नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): वर्दळीच्या द्वारका चौकात भरधाव कारने बसला पाठीमागून धडक दिल्याची घटना महामार्गावरील घडली. कारचालकाने अमली पदार्थाचे सेवन केलेले असल्यामुळे हा अपघात झाल्याची पोलीस दफ्तरी नोंद करण्यात आली आहे.
या घटनेनंतर कारचालकाने बसचालकास शिवीगाळ करीत दगड फेकून मारला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालकास अटक करण्यात आली आहे.
लक्ष्मण सुधाकर गोवर्धन (२८ रा.सांजेगाव ता.इगतपुरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित कारचालकाचे नाव आहे. याबाबत एस.टी.महामंडळाचे बसचालक चंद्रकांत भगवान वाघ (रा.मोघन जि.धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. वाघ गुरूवारी (दि.२) सायंकाळी धुळे नाशिक या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. बसमध्ये प्रवासी घेवून शहरात दाखल झाले असता द्वारका भागात हा अपघात झाला. सिग्नल पडलेला असल्याने ते पोलीस चौकीजवळ थांबलेले असतांना पाठीमागून भरधाव आलेली एमएच १५ डीएस ७८८० कार बसवर आदळली.
यावेळी ते बसखाली उतरून पाठीमागे नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता अमली पदार्थाचे सेवन केलेल्या संशयित कारचालकाने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत झटापट केली. यावेळी संतप्त कार चालकाने वाघ यांना दगड फेकून मारल्याने त्यांना दुखापत झाली असून या घटनेत त्यांच्या चष्म्याचेही नुकसान झाले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790