नाशिक (प्रतिनिधी): गेल्या वर्षीच्या डिसेंबर आणि चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्याचे वेतन तसेच पीएफ आणि ईएसआय रक्कम खात्यावर न जमा झाल्याने शहर प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या सिटीलिंक बसेसच्या वाहकांनी संप पुकारला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर रविवारी (ता.१७) सायंकाळपर्यंत कोणत्याही प्रकारचा तोडगा न निघाल्याने सिटी लिंक बससेवा विस्कळितच आहे.
रविवारमुळे शाळा-महाविद्यालयांसह शासकीय कार्यालये बंद असल्यामुळे चाकरमाने, विद्यार्थी व प्रवाशांचे हाल काहीसे कमी झाले असले तरी संप न मिटल्यास सोमवार (ता.१८) पुन्हा हाल होणार आहेत. यामुळे हा संप लवकरात लवकर मिटण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मागील महिन्यात वाहकांना संपावेळी डिसेंबर महिन्याचे थकीत वेतन ५ मार्च रोजी देण्याचे तसेच सात ते १० मार्चपर्यंत ई एस आय खात्यावर रक्कम जमा करण्यासंदर्भात माहिती देण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले होते.
११ ते १४ मार्च या कालावधीत जानेवारी व फेब्रुवारीचे वेतन दिले जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने दिलेले आश्वासन न पाळल्याने पुन्हा एकदा गुरुवार (ता.१४) पासून वाहकांनी संप सुरू केला आहे. रविवार (ता.१७) सायंकाळपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही. संबंधित ठेकेदार यांनी पुन्हा एकदा आश्वासन देत संप मागे घेण्यास सांगितले. मात्र, थकीत वेतन, पी एफ व ई एस आय रक्कम खात्यावर जमा होईपर्यंत आपण संप मागे घेणार नाही, असा पवित्रा सिटी लिंक बस सेवा वाहकांनी घेतला आहे.
सलग चौथ्या दिवशी सिटीलिंक बससेवा विस्कळित झाल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य प्रवाशांवर झाला असून प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी जास्तीचे भाडे देऊन पर्यायाने रिक्षासह इतर खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. वेतन वेळेवर जमा होत नाही तसेच इतर मागण्यांसाठी आत्तापर्यंत सिटीलिंक वाहकांनी जवळपास आठ वेळा संपाचे हत्यार उगारले आहे.
मात्र, तरीही प्रशासन त्या ठेकेदारावर कारवाईपेक्षा राजकीय वरदहस्त लाभलेल्या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप सिटीलिंक वाहकांनी केला आहे. रविवारी सकाळपासून तपोवन बस डेपोतून एकही बस शहरात निघाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे तीन दिवसांत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने अजून किती दिवस संप सुरू राहणार याबाबत स्पष्टता नसल्याचे वाहकांनी सांगितले.