नाशिक (प्रतिनिधी): जून महिन्यापासून शहरातील सर्वच शाळा-महाविद्यालय सुरू होत आहेत. शहरात जवळपास ४५००० विद्यार्थी सिटी लिंकने प्रवास करतात. त्यांच्यासाठी शहरात सहा ठिकाणी पास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सध्या निमाणी बसस्थानक येथे २ केंद्र असून आगामी १८ जुनपासून अन्य ठिकाणी पास केंद्र सुरू होतील, अशी माहिती सिटी लिंकचे व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली.
उन्हाळी सुट्यांमुळे विद्यार्थी संख्या घटल्याने सिटी लिंकच्या ४० बसेसच्या १०० हून अधिक बसफेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. दरम्यान जून महिन्यापासून शाळा-महाविद्यालय सुरू होणार असल्याने सिटी लिंकच्या वतीने बससेवेचे नियोजन सुरू आहे. सिटी लिंकच्या शहरात २५० बसेस धावतात. सध्या २१० बसेस धावत असून १ जुलै पासून विद्यार्थी व प्रवासी संख्या वाढल्यानंतर सर्व २५० बसेस धावणार आहेत. यामुळे विद्याच्थ्यौसह कामगार व बाहेरून येणारे पर्यटक व प्रवाशांचीही सोय होणार असून सिटी लिंकच्या उत्पन्नातही भरत पडणार आहे.
येथे होणार पास केंद्र: विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरुवातीला निमाणी बसस्थानक येथे तसेच १८ जुनपासून केटीएचएम महाविद्यालय, शिवाजीनगर तसेच तपोवन डेपो तसेच सिटी लिंकच्या कार्यालयातही बसपास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.