नाशिक (प्रतिनिधी): सिटीलिंक बसमधील इमर्जन्सी (पॅनिक) बटणाचा विनाकारण वापर केल्यास संबंधित प्रवाशावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा सिटीलिंक प्रशासनाने दिला आहे.
नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ‘नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड’ची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळामार्फत शहर आणि परिसरातील २० किलोमीटरपर्यंतच्या भागात नागरिकांना सिटीलिंक बससेवा पुरवली जाते. दररोज लाखो प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक सिटीलिंक बसमध्ये तसेच अधिकृत मोबाईल अॅपमध्ये इमर्जन्सी बटणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवासादरम्यान कोणतीही गंभीर समस्या उद्भवल्यास प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, हा या सुविधेमागील उद्देश आहे.
मात्र, अलीकडील काळात काही प्रवासी केवळ कुतूहलापोटी किंवा विनाकारण हे इमर्जन्सी बटण दाबत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर आले आहेत. यामुळे बस चालक, वाहक आणि नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय, खरोखरच अडचणीत असलेल्या प्रवाशांपर्यंत मदत पोहोचण्यात विलंब होण्याची शक्यता वाढते.
या पार्श्वभूमीवर सिटीलिंक प्रशासनाने इमर्जन्सी बटणाचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी जबाबदारीने व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सुविधा वापरावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.