नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): लेखानगर येथे उड्डाणपुलावर मुंबईच्या दिशेने बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने आग लागल्याचा प्रकार सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला. आग लागल्याने काही वेळासाठी वाहतुकीची कोंडी झाली होती.
तात्काळ अग्निशमन विभाग तसेच पोलिसांनी घटनास्थळी पाचारण करत एक तासानंतर आग विझवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. ट्रकमधील बटाटे जळून खाक झाले. मुख्यालय व सिडको अग्निशामक दलाच्या एकूण तीन बंबांच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.
नाशिक येथून मुंबईच्या दिशेने उड्डाणपुलावरून टक (यूपी ७५ एटी ९३९३) जात असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लेखानगर भागात त्याचे पाठीमागील टायर फुटले आणि काही वेळात अचानक टायरला आग लागली. आग लागल्यामुळे उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अग्निशमन विभागाने तब्बल अर्धा तासानंतर आग विझविली. ट्रकचा चालक तसेच क्लीनर सुदैवाने वाचले. ट्रकला लागलेली आग बघण्यासाठी सर्व्हिस रोडवरही नागरिक जमा झाले होते. अग्निशमन विभागाचे कर्मचारी किशोर पाटील, सोमनाथ थोरात, प्रमोद लहामगे, हर्षद पटेल, मोईन शेख, बंडू व्यवहारे, मल्हार अहिरे आदींनी आग विझवली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.