नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन प्रकरणात महत्वाची घडामोड… वाचा सविस्तर..

नाशिक, दि. २० मार्च २०२६: भोंदूबाबा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून, या प्रकरणातील धागेदोरे उलगडणारा संशयित नीरज जाधव याला नाशिक क्राईम ब्रँचने ताब्यात घेतले आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलीला मॉर्फ केलेल्या व्हिडिओंचे स्क्रीनशॉट पाठवून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी नीरज जाधव याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू होती. खरात प्रकरणातील काही महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच, खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणण्यात जाधवचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भरदिवसा घरफोडीत ६.७४ लाखांचा ऐवज लांबवला

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात महिलांवरील अत्याचारांचे शंभराहून अधिक व्हिडिओ असल्याची चर्चा असून, तथाकथित तांत्रिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. जाधवच्या ताब्यानंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकात नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांतील १२ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी खरातच्या घराची झाडाझडती घेतली असता दोन लॅपटॉप, सुमारे आठ लाखांची रोकड, पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर अखेर अटकेत; साथीदारासह पोलिसांच्या जाळ्यात

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, अडचणीत असलेल्या नागरिकांना, विशेषतः महिलांना, प्रभावी बोलण्याद्वारे विश्वासात घेत खरात त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करत असे. भविष्य सांगणे, पदोन्नती किंवा अडचणी दूर करण्याच्या नावाखाली तो भीतीचे वातावरण तयार करत होता. या प्रभावाचा गैरफायदा घेत महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: म्हसरुळला सिटीलिंक बसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

या प्रकरणाचा भांडाफोड एका पीडित महिलेने धैर्याने पुढे येत केला. धार्मिक व आध्यात्मिक दाव्यांच्या आडून फसवणूक करून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप समोर आले आहेत. पीडितेला धमकावून ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केल्याची तक्रारही नोंदविण्यात आली आहे.

सध्या या प्रकरणात नोंद झालेल्या तीन गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडून वेगाने सुरू असून, आणखी पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790