नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी(सीएमओ) आणि वैद्यकीय अधिकाऱ्यास ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (दि. १४) रंगेहाथ पकडले. डॉ. आबिद आबू अत्तार (४०) असे सीएमओचे नाव असून त्याचा साथीदार डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (४२) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदाराचा मित्र नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. नियमानुसार ६५ वर्षांपेक्षा जास्त वय आणि १४ वर्षे शिक्षा भोगलेली आहे, अशा कैद्यांना शासकीय समिती बाहेर सोडत असते. मात्र या समितीस संबंधित कैद्याचे ‘फिट फॉर सर्टिफिकेट’ची आवश्यकता असते. त्यासाठी डॉ. अत्तार व डॉ. खैरनार यांच्याकडे अर्ज केला असता दोघांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
विभागाने सापळा रचला असता दोघांनी शासकीय पंचासमोर तडजोड करीत तक्रारदाराकडून ४० हजारांची मागणी करून ३० हजार रुपयांची लाच घेतली. त्यामुळे विभागाने दोघांना रंगेहाथ पकडले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर आणि अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, किरण धुळे यांच्या पथकाने केली.