नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): पाचशे रूपयांच्या चलनी नोटांसारख्या हुबेहुब अशा बनावट नोटा प्रिंटरद्वारे छापून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याच्या संशयावरून अंबड पोलिसांनी संशयित अशोक अण्णा पगार (रा. सिन्नर) व हेमंत लक्ष्मण कोल्हे (रा. साईबाबा नगर, सिडको) यांना सोमवारी (दि.२७) ताब्यात घेतले.
अंबड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप ठाकूर यांनी गुन्हे शोध पथकाला सिडकोतील कामटवाडे परिसरात सापळा रचण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरिक्षक सुनील पवार यांच्या पथकाने माउली लॉन्स परिसरात सापळा रचला. यावेळी संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांची कसुन चौकशी करत झडती घेतली असात पाचशे रूपयांच्या बनावट ३० नोटा असे १५ हजार रूपये आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. बनावट नोटांचा बाजारात चलनी नोटा भासवून कोठे-कोठे वापर केला आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. (अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३५७/२०२४)