नाशिक। दि. ६ डिसेंबर २०२५: तांत्रिक कारण, नव्या कायदेशीर बाबी आणि अपुऱ्या मनुष्यबळाअभावी इंडीगोच्या सुरू असलेल्या घोळाचा नाशिकमधील प्रवाशांना देखील फटका बसला.
दिल्लीहून सकाळी आणि सायंकाळी येणारी फ्लाईट रद्द झाल्याने अनेकांना फटका बसला. बंगळूरू येथील फ्लाईट देखील रद्द झाल्याने प्रवाशांना माघारी परतावे लागले. तर अनेक पर्यटकांना विमान रद्द झाल्याने दुसऱ्या शहरातील विमानतळावर जाऊन अन्य विमान सेवेने मुंबई पर्यंत यावे लागले.
शहरात याच कंपनीच्या सात सेवा आहेत. शुक्रवारी (दि.५) दिल्लीची सकाळी साडे आठ वाजता आणि रात्री ८:२० वाजता येणारी फ्लाईट रद्द झाली. तर बंगळूरची फ्लाईट दुपारी एक दोन तास विलंबाने येणार असे सांगून ती रद्द करण्यात आली.
केवळ हैदराबाद, गोवा, अहमदाबाद या तीन शहरांच्या फ्लाईटस सुरळीत होत्या परंतु त्याही एक ते दोन तास विलंबाने होत्या. अनेकांनी वेबसाईटवरील स्टेटस बघूनच बाहेर पडण्याची तयारी केली होती मात्र, विमानतळावर पोहोचलेल्या नागरीकांना अकारण भुर्दंड पडला. नाशिकमधील एका टुरीस्ट व्यवसायिकाने दिल्ली ते पुणे असा टुरीस्ट ग्रुप घेतला होता. पुण्याची फ्लाईट रद्द झाल्याने त्याला खासगी व्हॉल्वोने संबंधीतांना पुण्यापर्यंत न्यावे लागेल. दोन ते तीन दिवसात ही सेवा सुरळीत होईल असे निमा एव्हीएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावळ आणि तानचे अध्यक्ष सागर वाघचौरे यांनी सांगितले.
![]()

