नाशिक। दि. १२ जानेवारी २०२६: मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामिनास मदतीच्या बदल्यात २ लाखांची लाच घेण्याचे मान्य केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय गोडे आणि अतुल क्षीरसागर यांच्या विरोधात लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार मूळ तक्रारदाराच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्याकरता मदत करण्यासाठी शासकीय विश्रामगृहचे उपहारगृहचालक कल्पेश अहिरे (२८) आणि रमेश आहिरे (६१) या दोघा बाप-लेकांच्या मध्यस्थीने आणि माध्यमातून शासकीय विश्रामगृह येथे २ लाखांची लाचेची रक्कम दोघांनी स्वीकारली.
दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी या उपाहारगृह चालकांना लाचेचे पैसे स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर एसीबीचे उपअधीक्षक एकनाथ पाटील, योगेश साळवे, दिनेश खैरनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एसीबीचे उप-अधीक्षक पाटील यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाणे येथे कल्पेश अहिरे, रमेश अहिरे पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर आणि पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गोडे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम ७ (अ) आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: १२/२०२६)
![]()


