नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात शब्द आणि सुरांनी मोहून टाकणारी पहिल्या दिवसाची संध्याकाळ तरूणाईसाठी अविस्मरणीय ठरली. गायिका नीती मोहन यांच्या सुमधूर आवाजाने तरुणाईची मनं जिंकली. अनेक गाण्यांवर तरुणांनी उत्स्फूर्तपणे ठेकाही धरला.
तपोवन मैदानावर आयोजित नीती मोहन यांच्या संगीत मैफलीचा शेकडो युवक – युवतींनी शुक्रवारी संध्याकाळी आनंद घेतला. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘इश्क वाला लव्ह’ या गाण्याने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ‘जब तक है जान’, ‘मैं तेरा हिरो’, ‘पद्मावत’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘साहो’, ‘कलंक’, ‘गंगूबाई काठियावाडी’ यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमधील गाणी गायली.
युवा महोत्सवातील गाण्यांच्या सादरीकरणानंतर गायिका नीती मोहन शर्मा म्हणाल्या की, “आपल्या देशाची ताकद तरुणाई आहे. मला या महोत्सवात सादरीकरण करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशातील तरुण प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे राष्ट्रीय युवा महोत्सवात येऊन मला खूप आनंद वाटला. तरूणांनी मोठी स्वप्न पहा आणि ती पूर्ण करा, नाशिक ही पवित्र भूमी आहे, या भूमीला सलाम आहे. या ठिकाणी एक जादू असून, येथील पाणी, मंदिर, फळे, फुले, भाज्या आणि लोकांसह सर्वकाही खूप सुंदर आहे.
नाशिक शहरात १२ ते १६ जानेवारी या कालावधीत सुरू असलेला २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव देशभरातील तरुणांसाठी प्रेरणास्रोत म्हणून उदयास येत आहे, जिथे देशाच्या विविध भागांतील तरुण आपल्या कलाकृती, स्टार्टअप आणि कल्पनांचे प्रदर्शन करीत आहेत.