नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): चौघे मित्र शाळा सुटल्यानंतर कार्बन नाक्यापासून जवळच सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवरील खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते. दोघे पाण्यात उतरले तर दोघेजण बाहेर होते. खड्यात साचलेल्या गाळामुळे प्रणव विनोद सोनटक्के (१४, रा. श्रमिकनगर, सातपूर), अंकुश किरण गाडे (१४, रा. साई रेसिडेन्सी, शिवाजीनगर) यांना बाहेर पडता आले नाही.
त्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि.५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने सातपूरच्या श्रमिकनगर, शिवाजीनगर भागात शोककळा पसरली आहे.
सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्बन नाक्यामागे असलेल्या एका कडेपठार नावाच्या परिसरात गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी कुठलेही सुरक्षा कुंपण घातलेले नसून मोठा खड्डा खोदण्यात आलेला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्डा तुडुंब भरलेला असून या खड्यात पोहण्यासाठी चौघे अल्पवयीन मुले सोमवारी सायंकाळच्या सुमारास गेले होते. यापैकी प्रणव व अंकुश हे दोघे खड्ड्यात उतरले. खड्यातील पाणी व गाळाचा अंदाज त्यांना आला नाही. यामुळे ते पाण्यात बुडाले.
हे बघून बाहेर उभ्या असलेल्या दोन्ही मुलांनी घाबरून तेथून निघून गेले. ही बाब त्या मुलांनी परिसरातील काही नागरिकांना कळविली. त्यानंतर एका सुजाण नागरिकाने घटनेची माहिती सातपूर पोलिस व अग्निशमन दलाला कळविली.
माहिती मिळताच सातपूर अग्निशमन केंद्राचे जवान बंबासह घटनास्थळी पोहोचले; मात्र तोपर्यंत स्थानिक तरुणांनी खड्यात उडी घेत दोघांना शोधून बाहेर काढून जवळच्या खासगी रुग्णालयात नागरिकांच्या मदतीने हलविले होते. तेथून तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून प्रणव व अंकुशला मयत घोषित केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली जात होती. या घटनेने संपूर्ण श्रमिकनगर भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.