नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून वातावरणात काहीसा गारठा जाणवत होता; मात्र रविवारी (दि. १७) किमान तापमानाचा पारा थेट १२.६अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. तर शनिवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ११ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
शुक्रवारी रात्रीपासून थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली होती. नाशिककरांना पहाटे हुडहुडी भरली. संध्याकाळी हवेत गारवा जाणवला. यामुळे नागरिकांनी शनिवारी उबदार कपडे वापरण्यावर भर दिल्याचे दिसून आले.
अवकाळी पावसानंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, लहरी निसर्गाने ती शक्यता फोल ठरविली. दोन दिवस वातावरणात गारठा वाढला. त्यानंतर पुन्हा ढगाळ हवामान तयार झाले होते. मागील आठवड्यापासून आकाश निरभ्र राहत असून हवामान कोरडे झाले आहे. यामुळे गुलाबी थंडी परतत असल्याचे नागरिकांना जाणवण्यास सुरुवात झाली.
गेल्या रविवारी सकाळी १५.३ अंशांपर्यंत किमान तापमान घसरले होते. १४ ते १५अंशाच्या जवळपास स्थिरावणारा पारा शनिवारी थेट १२अंशापर्यंत खाली आला. यामुळे थंडीचा कडाका शहरात चांगलाच वाढला होता. तसेच कमाल तापमानसुद्धा ३० ते २८अंशाच्यामध्ये स्थिरावत होते; मात्र शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता कमाल तापमानदेखील घसरले. २७.२अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान शहरात नोंदविले गेले.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे व थंड आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांचा वेग कमी झाला तरी नैऋत्य बंगाल खाडीत विषुववृत्ताजवळ चक्राकार वारे आहेत.
परिणामी कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. दरम्यान थंडी आणि धुक्यामुळे उत्तर भारतातून भुसावळ, मुंबई, पुणेकडे येणाऱ्या ११ गाड्या विलंबाने धावत आहेत.