नाशिक: 21 दिवसांच्या पाणी कपातीचे आव्हान; प्रशासनासमोर पेच

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर जलसंपदा विभागाने अंतिम पाणी आरक्षणाची घोषणा केली. त्यात एकूण ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी नाशिकसाठी आरक्षित करण्यात आले. उपलब्ध पाण्याचा साठा, आरक्षित केलेले पाणी व शिल्लक दिवसांचा विचार करता जवळपास ४३६ दशलक्ष घनफूट पाण्याची तूट दिसून येत आहे.

जवळपास २० दशलक्ष घनफूट रोजचा पाणी वापर लक्षात घेता २१ दिवसांची पाण्याची तूट राहणार असून, २१ दिवस सलग पाणीपुरवठा बंद करायचा की कमी दाब किंवा वीस टक्के पाणी कपात करायचा, असा पेच निर्माण झाला आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने मेंढीगिरी समितीच्या अहवालाचा संदर्भ देत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून मराठवाड्याकरिता जायकवाडीसाठी ८. ६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले. याविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या.

हे ही वाचा:  शेल्टर -2024 ला  उदंड प्रतिसाद; सुट्टीचे औचित्य साधून आज साईट व्हिजिटचे अनेकांचे नियोजन !

परंतु, त्यातून नाशिक व नगरकरांना दिलासा मिळाला नाही. अखेर नाशिक व नगरच्या धरणांतून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग करण्यात आला. १५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी महापालिकेने गंगापूर धरण समुहातून ४४००, मुकणेतून १६००, तर दारणेतून १०० अशाप्रकारे एकूण ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती.

मात्र, नाशिकच्या धरणांतून जायकवाडीला विसर्ग सुरू करण्यात आल्याने नाशिकच्या पाणी आरक्षणात कपात करत ५३०४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण देण्याची भूमिका जलसंपदा विभागाने घेतली. त्यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट कोसळले आहे. डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केला.

हे ही वाचा:  महत्वाची बातमी: नाशिक: शहरातील या महत्वाच्या भागांत आज वाहतुकीस 'नो एंट्री' !

शहरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला. अवकाळी पाऊस कोसळल्याने नदीनाले दुथडी भरून वाहिल्याने वहन तूट होणार नाही, त्यामुळे वहन तुटीचे पाणी जायकवाडीला सोडले जाऊ नये, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली. जलसंपदाने महापालिकेच्या ६१०० पाणी आरक्षण मागणीवर आक्षेप घेत ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांची भेट घेतली.

गत पाणी आरक्षण वर्षात शहरासाठी ५७५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाल्याने किमान तितके पाणी आरक्षण नाशिककरांसाठी उपलब्ध करून देण्याची महापालिकेने मागणी केली. ती मागणी फेटाळताना ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. वापरलेले पाणी, उपलब्ध आरक्षित पाणी व रोजचा पाण्याचा वापर लक्षात घेता २१ दिवस पाण्याची तूट भरून काढण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.

हे ही वाचा:  नाशिक: बँकेतून बोलत असल्याचे भासवत ७ लाख रुपयांचा गंडा

उपलब्ध पाण्यातून अशी निघते तूट
महापालिकेने मागणी केलेले पाणी- ६१०० दशलक्ष घनफूट.
जलसंपदाने मंजूर केलेले आरक्षण- ५३१४ दशलक्ष घनफूट.
एकूण कपात- ७१४ दशलक्ष घनफूट.
मागील वर्षाच्या अंदाजाने शहराला आवश्‍यकता- ५७५० दशलक्ष घनफूट.
४३६ दशलक्ष घनफूट पाण्याचा कट.
शहराला होणारा रोजचा पाणी पुरवठा १९.७५ दशलक्ष घनफूट.
आरक्षणाचा कालावधी १५ ऑक्टोंबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ (२९० दिवस)
२९० दिवसांपैकी ६० दिवस पुरवठा. २३० दिवसांचे आरक्षण शिल्लक.
६० दिवसात ११८५ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर.
२३० दिवसांसाठी ४१२९ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक.
आरक्षित ४१२९ दशलक्ष घनफूट पाणी २०९ दिवस पुरणार.
२१ दिवसांची पाण्याची तूट.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790