
मुंबई। दि. २० ऑगस्ट २०२५: गेले दोन दिवस मुंबईला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. अशातच आज तिसऱ्या दिवशी हवामान विभागाकडून मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत मागील 24 तासांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. गेले 48 तास एमएमआरसाठी रेड अलर्ट होता आणि तसाच मुसळधार पाऊसही पडला. आताही पुढच्या तीन तासांसाठी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली. आज मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच दोन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई लोकलवर झाल्याचं पाहायला मिळतंय. आज तिसऱ्या दिवशीही मुंबईची लाईफलाईन सुरळीत होऊ शकलेली नाही. आज मुंबईत पावसाचा जोर ओसरला आहे. पण, लोकल सेवा मात्र अजून विस्कळीतच आहे. त्यामुळे चाकरमान्यांन मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईच्या लाईफलाईनची सध्याची स्थिती काय?:
मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सेवा पुरती विस्कळीत झाली होती. अशातच आज मुंबईत पावसाचा जोर ओसरला असला तरीसुद्धा लोकल सेवा विस्कळीतच आहे. मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरची सेवा विस्कळीत आहे.
पश्चिम रेल्वेची सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू :
मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरच्या 17 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रुळांवर पाणी साचल्यानं लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पहाटे 3.40 ते 5.31 दरम्यानच्या 17 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चर्चगेटकडे जाणाऱ्या सहा तर विरारला जाणाऱ्या चार गाड्या रद्द आहेत. सध्या पश्चिम रेल्वे लाईनवरची लोकल सेवा ते दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं सुरू आहे.
मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेची परिस्थिती काय?:
दोन दिवस मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली. अजूनही मध्य रेल्वेची सेवा पुर्ववत होऊ शकलेली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तर हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे.