महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता ‘लॉगिन’ करणे अनिवार्य

नाशिक, दि. ०७ ऑगस्ट २०२५: सायबर सुरक्षितता तसेच वीज ग्राहक माहितीच्या गोपनीयतेसाठी महावितरणच्या लघुदाब वर्गवारीच्या वीजबिलाची पीडीएफ प्रत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन डाऊनलोड करण्यासाठी आता संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या सायबर सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा बदल करण्यात आला आहे.

महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘वीजदेयक अवलोकन/भरणा’ (View/Pay Bill) पेजवर लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांना चालू महिन्याच्या वीजबिलाची पीडीएफ प्रत ऑनलाइन डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र याआधी केवळ १२ अंकी ग्राहक क्रमांक सबमीट करून वीजबिल डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध होती.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शेतमालाची आधारभूत दरानुसार होणार खरेदी; शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी मुदतीत पूर्ण करण्याचे आवाहन

आता नव्या बदलात वीज बिल लॉगिनशिवाय ऑनलाइन भरण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मात्र पीडीएफ वीजबिल डाऊनलोड करण्यासाठी नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) करणे अनिवार्य आहे. लॉगिनची लिंकदेखील ‘वीजदेयक अवलोकन/भरणा’ (View/Pay Bill) पेजवर उपलब्ध आहे. तसेच ज्या ग्राहकांनी आतापर्यंत लॉगिनसाठी नोंदणी केलेली नाही त्यांनी ग्राहक क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेल (असल्यास) माहिती भरून नोंदणी करणे तसेच प्रवेश नाम (लॉगिन आयडी) व पासवर्ड (परवली शब्द) निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी देखील लिंक त्याच ठिकाणी उपलब्ध आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत ज्येष्ठ नागरिकाला लुटले

नोंदणीकृत प्रवेश (लॉगिन) केल्यानंतर स्वतःच्या एकापेक्षा अधिक वीजजोडण्यांसाठी विविध ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी लॉगिन केल्यानंतर १२ अंकी ग्राहक क्रमांक लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच वीज बिलावरील नाव, वीज भार बदलणे, तक्रार करणे किंवा तक्रारीची सद्यस्थिती पाहणे, वीज बिलांचा भरणा, पत्ता बदलणे व इतर सर्व ऑनलाइन सेवांचा वीज ग्राहकांना लाभ घेता येईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790