नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ता सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पार्टी केल्याचा आरोप आ. नितेश राणे यांनी विधानसभेत केला.
सलिम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आ. राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यासंदर्भातील फोटो दाखवत गंभीर आरोप केले. सुधाकर बडगुजर यांना कोणाचा वरदहस्त आहे, त्यांना हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाकडून कसे संरक्षण दिले जात आहे, शिवसेना भवन बॉम्बस्फोटाने उडवण्याचा कट करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही समोर आणावे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली.
याच मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे आक्रमक झाले. ते म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महानगर प्रमुख देशद्रोहीसोबत पार्टी करत आहेत. मग या सुधाकर बडगुजर यांना वाचवण्यासाठी कोण फोन फोनी करत आहे.
देशद्रोहसोबत डान्स पार्टी करणाऱ्यांना वाचवणारी राजकीय शक्ती कोण आहे? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? सुधाकर बडगुजर यांचे लागेबांधे कोणाशी आहे. बडगुजर हा छोटा मासा आहे. या प्रकरणात मोठ्या व्यक्तीलाही उघड करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा लावून धरला. १९९३ मधील बाँबस्फोटातील आरोपींशी संबंध ठेवणाऱ्यांना कोण वाचवत आहे. शिवसेना भवन उडवण्याचा कट असलेला आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. या घटनांमुळे दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढतो. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे शेलार यांनी म्हटले. हा प्रकार गंभीर आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याची चौकशी होईल. ही चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल. त्यासाठी एसआयटीला विशिष्ट काळाची मुदत दिली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बडगुजर यांच्याकडून आरोपांचे खंडन:
सलीम कुत्ता बरोबर माझा कधीही संबध नव्हता राजकीय हेतून आरोप केले आहेत. माहिती घेऊन आरोप केलेले नाही. माझे संबध अगोदर नव्हते..आताही नाही. सार्वजनिक जीवनामध्ये एखादया ठिकाणी भेट झाली असेल त्याची मला माहित नाही असे सांगत उध्दव ठाकरे गटाचे नाशिक शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी विधानसभेत त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन केले.
बडगुजर यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, पालकमंत्र्यांनी सभागृहात जे आरोप केलेत, त्यांनी योग्य माहिती घेतली नाही. २०१६ मध्ये रहाटकर प्रकरणात वेगळया विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा झाली होती. त्या सभेविरोधत शिवसैनिकांनी आंदोलन केले. त्यामुळे अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. माझ्यावर देखील गुन्हा दाखल होता, मी १५ दिवस जेलमध्ये होतो. जेल मध्ये बॉम्ब स्फोटातील आरोपी होते. त्यांची आम्हाला कल्पना देखील नव्हती. माझ्यावर ज्या काही केसेस दाखल, त्या राजकीय आंदोलनातून सलीम कुत्ता नाव जोडलं गेलं, त्यांना अटक झाली असेल. मला २०१६ मध्ये अटक झाली, त्यावेळी कैदी असतील. व्हिडिओचे मोर्फिंग केलं गेले असावे असेही त्यांनी सांगितले.
![]()


