नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सोलापूरचा एमडी कारखाना उभारणाऱ्या नाशिकचा रहिवासी उमेश सुरेश वाघ याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. विरारच्या यशवंतनगरात प्रेयसीला भेटण्यासाठी आला असता पथकाने त्यास अटक केली.
ड्रग्जमाफिया फय्याज हा नाशिक पोलिसांना हवा आहे. त्याचा मुख्य हस्तक उमेश याने नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या वैजनाथ हळवेच्या मदतीने एमडी निर्मितीचे बस्तान मांडले होते. फय्याजसाठी काम करणारे हे दोघे नाशिकमध्ये सनी पगारे याला एमडी विक्री करायचे, असे तपासात समोर आले आहे. सनी पगारे याने उमेशमार्फत फय्याजला त्याचा ‘माल’विक्रीसाठी ‘मार्केट’ उपलब्ध करून दिले होते.
उमेश विरारला आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना मिळाली. सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, नाझीमखान पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मुख्य म्होरक्या हाती:
सामनगाव गुन्हह्यातील सर्व संशयितांना मोक्का लावला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून उमेश फरार होता. बंगळुरू, केरळ, हैदराबाद, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांत उमेश आश्रय घेत होता. सामनगाव गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत १३ संशयितांना अटक केली असून, त्यातील मुख्य सूत्रधार फय्याज हा फरार आहे.
ठाणे कारागृहात भेट:
उमेश वाघ याने २०१६ साली ठाणे येथे एका चेकमेट कंपनीत दरोडा टाकून १२ कोटींची लूट केली होती. ठाणे पोलिसांनी उमेशला अटक केली होती. त्यास ठाणे कारागृहात डांबण्यात आले होते. फय्याज पालघरच्या गुन्ह्यात अटकेत होता. कारागृहात उमेश व फय्याज हे भेटले. २०२० ला जामिनावर सुटका झाल्यानंतर फय्याजसोबत मिळून उमेश याने एमडी निर्मिती व विक्रीच्या व्यवसायात उडी घेतली. फय्याज हा २००६ पासून एमडी विक्री करत असून, त्याच्याविरुद्ध विविध शहरांत गुन्हे दाखल आहेत.
उमेश पुरवठादार:
सोलापुराच्या कारखान्यात तयार होणारा एमडीचा माल उमेश हा नाशिकला सनीकडे आणून देत होता. त्यानंतर सनी एमडीचा पुरवठा करत होता. सनीसह त्याची टोळी कारागृहात आहे. या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे.