मुंबई। दि. ३१ जुलै २०२५: आरोपींचे वेगवेगळ्या कायदेशीर मुद्द्यांवर एकामागोमाग अर्ज, मुंबई उच्च न्यायालय सर्व सर्वोच्च न्यायालयात अपिले, तपाससंस्थांमधील बदल, खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या अशा अनेक कारणांमुळे प्रदीर्घ रखडपट्टी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट-२००८ या प्रकरणाचा निकाल अखेर आज, गुरुवारी जाहीर होणार आहे. मुंबई सत्र न्यायालय इमारतीतील विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी हे हा बहुचर्चित निर्णय सकाळी ११ वाजता सुनावणार आहेत.
भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या आरोपींची सुटका होणार की त्यांना दोषी ठरवले जाणार, हे ठरणार आहे.
२९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील मशिदीजवळ एलएमएल फ्रीडम मोटारसायकलमध्ये लावलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट होऊन हाहाकार उडाला होता. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०१ जण जखमी झाले. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट घडवला. त्यासाठी आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितने काश्मीरमधून आरडीएक्स आणले’, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
मालेगावात बंदोबस्त:
मालेगाव : निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगावी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात स्थानिक पोलिस यंत्रणेसह अतिरिक्त दहा अधिकारी, शंभर कर्मचाऱ्यांसह दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.