मालेगाव (प्रतिनिधी): मालेगावला शासकीय सामान्य रुग्णालयात आयसीयुमध्ये तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. आयसीयूमध्ये रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांचा राग अनावर होऊन त्यांनी तोडफोड सुरु केली. यात एकानी तर ऑक्सिजन सिलिंडर उचलून जमिनीवर आदळले. या सर्व प्रकारात याच रुग्णालयातील डॉ. फराह नावाच्या वैद्यकीय अधिकारी थोडक्यात बचावल्या. या सर्व प्रकारामुळे रुग्णालयात गोंधळ उडाला आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. मात्र पोलीस उपअधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर काम पूर्ववत सुरु झाले. पुरेसे संरक्षण मिळत नसल्याची तक्रार यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. मात्र पोलीस उपअधीक्षकांनी पुरेशा बंदोबस्ताचे आश्वासन दिले.
आज रविवारी (दि.19 एप्रिल 2020) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. इस्लामपुरा भागातील एका अत्यवस्थ रुग्णाला नातेवाईक येथे घेऊन आले होते. त्याला कोरोनाची लक्षणं दिसल्यामुळे ताबडतोब आयसोलेशन वार्डमध्ये हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र या प्रक्रियेदरम्यानच रुग्ण दगावला. या प्रकारामुळे नातेवाईकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रुग्णालयाच गोंधळ घालायला सुरुवात केली आणि तोडफोडही केली. एकाने ऑक्सिजन सिलिंडर उचलून जमिनीवर फेकले, यावेळी ऑन ड्युटी असलेल्या डॉ. फराह थोडक्यात बचावल्या. यानंतर मालेगावचे उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी धाव घेतली. त्यावेळी अपुऱ्या संरक्षणाबद्दल कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली. मात्र अजून बंदोबस्त वाढविला जाईल आणि असे प्रकार होऊ देणार नाही असे आश्वासन नवले यांनी दिले. त्यानंतर पुन्हा रुग्णांवर उपचार सुरु झाले.
आम्ही.. महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुपची भूमिका..
आरोग्य विभाग कोरोनाशी लढण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. रुग्णांची देखभाल करत आहेत. अशावेळी रुग्णालयावर जर असा प्रसंग ओढवत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो..