मालेगाव (प्रतिनिधी): शहराची विशेष ओळख ही यंत्रमागच्या माध्यमातून झाली आहे. रमजान सारख्या पवित्र महिन्यात कोरोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी केंद्रशासनाने घोषीत केलेल्या लॉकडाऊनमुळे या सर्व यंत्रमागाची खडखडाट थांबली होती. परिणामी यावर अवलंबून असणार मोठा मजूर वर्ग रोजंदारीपासून वंचित होता. शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधीत (कंटेन्मेंट झोन) क्षेत्राबाहेरील सर्व यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी दिली असून याची सर्व संबंधितांनी नोंद घेवून यंत्रमाग सुरू करण्यात यावेत अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. यावेळी इनर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, उपविभागीय दंडाधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, धान्य वितरण अधिकारी सुरेश थोरात आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, शासनाने यंत्रमाग सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी, यंत्रमागचे चालक व मालकांनी आपल्या मजुरांची विशेष काळजी घ्यावी. मजुरांमध्ये सुरक्षीत अंतर व आवश्यक खबरदारी बाळगावी. मजुरांनी त्यांना आजाराची थोडी जरी लक्षणे जाणवत असली तरी तात्काळ स्वत:ला अलगीकरण करून आवश्यक उपचार घ्यावेत. यंत्रमाग अखंडीतपणे सुरू राहण्यासाठी मालक, चालकांसह मजुरांनी विशेष काळजी घेवून आपला रोजगार नियमीत सुरू राहील यासाठी प्रयत्नशिल रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
धान्याचा तुटवडा नाही तर गोडावूनची कमतरता नाही
लॉकडाऊनच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित आहे. रोजगाराअभावी नागरिकांवर उपासमारीची वेळ येणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील जवळपास 1 लाख 22 हजार नागरिकांना वितरीत करण्यात येणारे धान्यापैकी 97 टक्के धान्याचे वाटप झाले आहे तर 7 लाख 190 केशरी कार्डधारकांचे 50 टक्के धान्य वाटप झाले आहे. शहरातील एकूण 130 रेशन दुकानांमार्फत याचे वितरण नियोजनबध्द सुरू असून बिगर रेशनकार्ड धारकांनाही मोफत तांदुळ वाटपाचे वितरण सुरू झाले आहे. धान्य वितरणासाठी शहरामध्ये धान्याचा तुटवडा नसून धान्य साठविण्यासाठी गोडावूनची कमतरता नाही. धान्याची मागणी व वितरणाचे सुयोग्य नियोजनामुळेचे हे शक्य झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.
व्यवसायांवर बंदी लादण्यापेक्षा रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसींगवर भर द्यावा
शहरातील व्यवसाय सुरळीत होण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करावे. बँका, पेट्रोलपंपासह आदि व्यवसाय सुरळीत करावेत. मात्र हे करतांनाच मिळून येणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्णांचे कटाक्षाने ट्रेसींग करावे. त्यासाठी सिडीआर रिपोर्टची मदत घेवून सुक्ष्म पध्दतीने कॉन्टॅक्ट ट्रेसींग केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. नागरिकांनी देखील आपले दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.