मुंबई। दि. ३१ जुलै २०२५: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले. 1000 पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज (३१ जुलै २०२५) निकाल सुनावण्यात आला. भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. आता, तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला.
न्यायालयाने नेमकं काय सांगितलं?
बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं. पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं. तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं. दुचाकीचा चेसीस नंबर देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेचे दाव्यांवर न्यायालयाचं समाधान झालं नाही. आधी लावलेला मोक्का नंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचं न्यायालयाने सांगितलं. UAPA साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे UAPA लागू होत नाही. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवरदेखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले.
आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही, असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले.