नाशिक। दि. १९ ऑगस्ट २०२५: राज्यात आजही मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने दिला आहे. मुंबईत सुद्धा सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. सततच्या पावसाचा मुंबई लोकलला मोठा फटका बसला आहे. सध्या तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक सुरू असली तरी उशिराने धावत आहे. नाशिकला सोमवारी (दि. १८) रिमझिम पाऊस पडला असला तरी आज (दि. १९) ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुढील २४ तास अतिमुसळधार:
राज्यात पुढील २४ तासांसाठी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. १७ ते २१ ऑगस्टपर्यंतच अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जर महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच जर काही अडचण आली तर महापालिकेने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. १९१६ या नंबरवर संपर्क साधू शकतात.
अचानक एवढा पाऊस का पडतोय ?:
मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस पडतो आहे. सोबतच मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. परिणामी द्रोनीय रेषा तयार झाली आहे, जी उत्तर कोकण ते केरळपर्यंत आहे. त्यामुळेच कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात आणि घाट माथ्यांवर मुसळधार तर उर्वरित राज्यात पावसाच्या सरी कोसळतांना दिसत आहेत.