नाशिक (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यात ५ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेतील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. पुढील तीन दिवस किमान तापमानात १ ते २ अंश तसेच कमाल तापमानात २ ते ३ अंशाने वाढ होणार असल्याने थंडीची तीव्रताही कमी राहणार आहे.
चक्रीवादळाच्या परिणामामुळे सोमवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत तापमानात अधिक वाढ झाली. मंगळवार व बुधवारी नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत अधिक तापमान जाणवण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांना चक्रीवादळामुळे पूर्वेकडून लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे अटकाव होत आहे. त्यामुळे दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात मात्र या वातावरणाचा फारसा परिणाम होणार नाही.