धुळ्यात नीचांकी १० अंश; नाशिक १३ अंशांवर किमान तापमान
नाशिक (प्रतिनिधी): उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात तापमानाचा पारा घसरला असून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते ४ अंश सेल्सियसने घसरण झाली आहे. राज्यात रविवारी (दि.२४) धुळ्यात १० अंश सेल्सियस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यात निफाडला पारा ११.८, नाशिक शहरात १३ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ अंशापर्यंत घसरला होता. नाशिकमध्ये रविवारी किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.९ तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ०.५ अंशाने घसरला होता. राज्यात कोकण वगळता सर्वत्र किमान आणि कमाल तापमानात घसरण झाली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे.
आजपासून राज्यामध्ये चार दिवस थंडी वाढणार:
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात २५ नोव्हेंबरनंतरही पुढील चार दिवस वातावरणात गारवा टिकून राहणार आहे. किमान आणि कमाल तापमानात सरासरी २ अंशाने घसरण होण्याचा अंदाज असून बोचरी थंडी अनुभवायला मिळणार आहे.
– माणिकराव खुळे, निवृत्त शास्त्रज्ञ, पुणे हवामान विभाग