नाशिक। दि. १९ सप्टेंबर २०२५: परतीच्या पावसाने राज्यात दमदार सुरुवात केली असून पुढील दोन आठवडे नाशिकसह महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाचे अधूनमधून सत्र सुरूच राहणार आहे. २१ सप्टेंबरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या १८ ते २५ सप्टेंबरदरम्यानच्या अंदाजानुसार, तळकोकण, नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस होईल, असेही सांगण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात यलो अलर्ट:
पुढील चार दिवसांसाठी राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी नाशिक, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर विदर्भात पावसाचा जोर अपेक्षित आहे. शनिवारी व रविवारी सोलापूर तसेच दक्षिण मराठवाडा या भागांतही यलो अलर्ट लागू राहणार आहे.
गुरुवारी नाशिकसह राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. नाशिक शहरात दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले.
![]()

