राज्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबई। दि. १८ ऑगस्ट २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली. रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांत अधिक पाऊस झाला असून, हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, विष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागातील 800 गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोला, चांदूररेल्वे, मेहकर, वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत 170 मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील 10 ते 12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असून, प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: सातपूर गोळीबारातील फरार शुभम निकम अखेर गजाआड

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये, एसएमएस ॲलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा, येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेत, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही, स्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

घरांच्या पडझडीसाठीची मदत, पंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावे, दरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावी, तसेच निवारा केंद्रात भोजन, शुद्ध पाणी व पांघरूण यांची पुरेशी सोय करावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here