मुंबई। दि. ०२ ऑक्टोबर २०२५: राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या हंगामात एसटी महामंडळाने केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
सणासुदीच्या काळात राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार १० टक्के दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. पण राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर पडणारा आर्थिक बोजा लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी ही दरवाढ रद्द करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने दिवाळी हंगामासाठी (१५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान) १० टक्क्यांची हंगामी भाडेवाढ जाहीर केली होती.
साधी, निमआराम (हिरकणी), शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व प्रकारच्या बसगाड्यांना ही वाढ लागू होणार होती. मात्र, आता ही हंगामी दरवाढ रद्द झाल्यामुळे या काळात प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नाही. प्रवाशांना नेहमीच्या दरातच दिवाळीतदेखील एसटीचे तिकीट काढणे शक्य होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790