नाशिक। दि. २५ जुलै २०२५: राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पूर्व विदर्भात पावसाने थैमान घातले असून चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शाळा, कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा तसेच कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भंडाऱ्यासह चंद्रपूर जिल्ह्यात देखील हवामान खात्याने पावसाबाबत दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, खासगी कोचिंग क्लासेस, अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
गुरुवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यासह राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे सर्वाधिक २४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाटमाथा, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत जोरदार सरींची, तसेच जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ही प्रणाली ठळक होण्याची शक्यता असून, ती पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगर, सिरसा, मेरठ, हर्दोई, पाटणा, जमशेदपूर, दिघा, कमी दाबाचे केंद्र ते उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. विदर्भापासून कमी दाबाच्या केंद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.