मुंबई। दि. १८ ऑगस्ट २०२५: आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे गोवा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये पुढील सात दिवसांत अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील सात दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असताना गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाची संततधार सुरु आहे. अशातच आज (18 ऑगस्ट) आढवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. सध्या देखील पावसाचा जोर कायम असून मुंबई, ठाणेकरांसाठी पुढील 48 तास पावसाच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. कारण मुंबई ठाण्याला पुढील 48 तासांसाठी हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता कुठे?
१७ ते १९ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि १९ व २० ऑगस्टला गुजरातमधील सौराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील दोन दिवसांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. १८ ऑगस्टला किनारी आंध्र प्रदेशात तसेच ओडिशा आणि तेलंगणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजपासून २१ ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र, गुजरात, २० ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, १८ ऑगस्टला मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्राची स्थिती काय?
मध्य भारतावर निर्माण होत असलेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील सर्वच जिल्हे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, उर्वरित मुंबई महानगर, सोलापूर, धाराशिव, आणि लातूर जिल्ह्यांचा काही भाग यांचा समावेश आहे. या दरम्यान खान्देश आणि उर्वरित मराठवाड्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तुलनेत विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.