आगीच्या अफवेने ‘पुष्पक’ मधील प्रवाशांची ट्रॅकवर उडी; १३ जणांचा मृत्यू…

जळगाव (प्रतिनिधी): लखनऊहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसच्या (12533) एस फोर या विनाआरक्षित डब्यातील हॉट एक्सेल व ब्रेक-बायडिंगमध्ये अचानक आगीच्या ठिणग्या उडालेल्या काही प्रवाशांनी पाहिले. त्यांना वाटले आगच लागली. काही क्षणांत ही अफवा कोचमध्ये पसरली.

जळगावपासून जवळच असलेल्या माहेजी आणि परधाडे या स्थानकांदरम्यान सायंकाळी ४.३० ते ४.४५ च्या दरम्यान ही घटना घडली. प्रवासी घाबरलेले होते. त्यापैकी एकाने चेन ओढून रेल्वे थांबवली. जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी शेजारच्या ट्रॅकवर उड्या घेतल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

त्याच वेळी या ट्रॅकवर कर्नाटकातील यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनकडे जाणारी कर्नाटक एक्स्प्रेस (12627) आली. उड्या मारलेल्या प्रवाशांना ही रेल्वे दिसलीच नाही. ताशी ११० ते ११५ किमी गतीने धावणारी कर्नाटक एक्स्प्रेस या प्रवाशांना चिरडून निघून गेली.

यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १० ते ११ जण जखमी झाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमधून शोकसंदेश पाठवून घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच मृताच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनीही धाव घेऊन बचाव कार्यात मदत केली. रेल्वे खात्यातर्फे गंभीर जखमींना ५ ते ५० हजार रुपये आर्थिक मदतही करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  राष्ट्रीय मतदार दिवस: राज्यस्तरीय कार्यक्रमानिमित्त नाशिकला आज (दि. २५) विविध कार्यक्रम

अपघाताचे कारण : वळणामुळे दिसली नाही दुसऱ्या ट्रॅकवरची कर्नाटक रेल्वे:
माहेजी व परधाडे गावांदरम्यान भोला नदी व त्यावर पूल आहे. पाचोऱ्याकडे जाताना रेल्वेमार्गाला कठीण वळण आहे. पाचोऱ्याकडून रेल्वे येत असेल तर ती वळल्याशिवाय दिसत नाही. पुष्पक एक्स्प्रेसमधून उतरलेल्या लोकांना कर्नाटक एक्स्प्रेसजवळ आल्यानंतर दिसली व दूर जाण्यास संधी मिळाली नाही. जे थोडे बाजूला गेले किंवा ज्यांनी पुलावरून उड्या मारल्या ते वाचले. ज्यांना ती संधी मिळाली नाही ते चिरडले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790