नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्र सरकारची लोकप्रिय योजना उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठी बातमी दिली आहे.
मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी (४ ऑक्टोबर) उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवले आहे.
यापूर्वी गेल्या महिन्यात रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती. तर आज उज्ज्वला लाभार्थीची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय जाहीर केले.
रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी कमी केले. त्यानंतर LPG सिलिंडरची किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली होती तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना गॅस उपलब्ध झाला. आता या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपये अनुदान (सबसिडी) मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता ६०० रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध होईल.