नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एमडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित पाटील याच्यासह चौघांचा ताबा नाशिक शहर पोलिसांनी घेतला. गुन्हे शाखेच्या पथकाने
ऑर्थररोड कारागृहातून पाटीलसह इशान शेख, हरिष पंत, रोहित चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यांना शनिवारी (दि. ९) संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पाटीलचा ताबा मिळाल्याने पाटीलचे राजकीय कनेक्शन उघडकीस होणार आहे.
याच प्रकरणात पोलिस पथकाने दोन दिवसांपूर्वी शिवाजी शिंदे, भूषण पानपाटील, अभिजित बलकवडे यांना अटक केली असून संशयित दि. १३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल एनडीपीएस गुन्ह्यात ललित पाटीलचे गोदाम हे नाशिक शहर पोलिसांनी उद्ध्वस्त करत तब्बल पाच कोटींचे एमडी ड्रग्ज आणि साहित्य जप्त केले होते.
साकीनाका पोलिसांनी ललित पाटील यास बंगळुरू येथून अटक केली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची आर्थररोड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात ललित पाटीलचा ताबा मिळवण्याकरिता न्यायालयात अर्ज केला होता.
न्यायालयाने अर्ज मंजूर करत ललित पाटीलसह चौघांचा ताबा शहर पोलिसांनी घेतला. संशयितांना मुंबई न्यायालयाची हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रात्री शहरात आणण्यात आले. शनिवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दोन दिवसांपूर्वी ललित पाटीलचा भाऊ भूषण पानपाटील, अभिषेक बलकवडे आणि शिवाजी शिंदे या संशयितांचा पुणे पोलिसांकडून ताबा घेण्यात आला. तिघे संशयित दि. १३ पर्यंत पोलिस कोठडीत आहे.
पोलिसांचाही समावेश ? :
ललित पाटील याच्या संपर्कात पोलिस अधिकारी व कर्मचारी असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. पुणे व मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले होते. पोलिस कर्मचाऱ्यांचे पाटीलसोबत कनेक्शन असल्याने आणखी प्रतिमा मलिन होईल या उद्देशाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंबी देत सोडून दिल्याची चर्चा होती. ललित पाटीलचा ताबा घेतल्याने संपर्कात असलेल्या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.
राजकीय कनेक्शन होणार उघड?:
मुंबई-साकीनाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ललित पाटील याला अटक झाल्यानंतर, “मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं आहे. कोणाकोणाचा हात आहे, सर्व सांगेल मी’ असं माध्यमांना सांगितलं होतं. त्यामुळे आता नाशिक पोलिसांनी ललिताचा ताबा घेतल्यानंतर तपासात ललितचं राजकीय कनेक्शन उघड होईल का याकडे नाशिकरांचे लक्ष लागले आहे.
![]()
