नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): संशयित ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा (पानपाटील) भाऊ एमडी ड्रग्जचा मास्टरमाइंड संशयित भूषण पाटील याच्या सोने-चांदी खरेदी-विक्रीप्रकरणी नाशिकच्या एका संशयित सराफ व्यावसायिकास पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
रात्री उशीरा पुणे पोलिसांचे एक पथक त्या सराफाला घेऊन नाशिकमधून पुण्याच्यादिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात आले. मात्र नाशिक पोलिसांकडून यास दुजोरा मिळू शकलेला नाही. या सराफाच्या नावाचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
ललित पाटील हा ससून रुग्णालयात दाखल असताना नाशिकमध्ये त्याचा ड्रग्जचा कारखाना संशयित भूषण व अभिषेक हे चालवत होते. तसेच ड्रग्जच्या व्यवसायात त्यांना त्याची मैत्रिण संशयित प्रज्ञा कांबळे ही महिलाही मदत करत होती असे पुणे पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
यामुळे कांबळेलाही पोलिसांनी आरोपी केले आहे. नाशिकमध्ये भूषण याने सराफ व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी केली होती, अशी धक्कादायक बाबही पुणे व नाशिक पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी भूषणने ज्या महिलेकडे चांदी ठेवली होती ती ७ किलो चांदी यापुर्वीच जप्त केली आहे.
तसेच भूषणचा साथीदार व खजिनदार’ संशयित अभिषेक बलकवडेच्या घरातून पुणे पोलिसांनी तीन किलो सोनेही यापुर्वी हस्तगत केले होते. उर्वरित सोने नेमके कोठे आहे? भूषणने पाच किलो की आठ किलो की यापेक्षा जास्त सोने खरेदी केले होते? याचा तपास पुणे पोलिस करत आहेत. यासाठी पुण्याचे एक पथक नाशिकमध्ये तळ ठोकून होते. याच पथकाने संशयित सराफाला चौकशीसाठी नाशिकमधून ताब्यात घेतल्याचे पुण्याच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
सराफ हा ललितचा मित्र?:
इग्ज विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांमधून भूषण हा नाशिकमधून एका सराफाकडून नेहमी सोने, चांदीची खरेदी करत होता. तो सराफ हा ललित पाटील याचा मित्र असल्याचेही बोलले जात आहे. यामुळे आता या सराफाच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविली जात आहे.