मुंबई। दि. ८ सप्टेंबर २०२५: ऑगस्ट महिना संपला, आता सप्टेंबर महिन्याचाही पहिला आठवडा गेला, पण लाडक्या बहिणींच्या खात्यात अजून ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जुलै महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता लांबणीवर जात असल्याचं समोर आलं आहे. सप्टेंबर महिना सुरु होऊन आठ दिवस झाले तरी पैसे अद्याप न आल्याने लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजने अंतर्गत महिलांना त्यांच्या बँकेत दरमहिन्याला 1500 रुपये दिले जातात. सुरुवातीला वेळेत हे पैसे बँक खात्यात जमा होत होते. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लाडक्या बहिणींचे हप्ते हे लांबणीवर जात असल्याचं दिसत आहे.
ऑगस्टचे पैसे अद्याप खात्यात न आल्याने महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आता पहिला आठवडा उलटला तरी पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे लाडक्या बहिणी पैसे कधी येणार असा प्रश्न करत आहेत.
याबाबत, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरीत होईल. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरु ठेवण्याचा सरकारचा संकल्प आहे. या योजनेचा जो काही लाभ आहे तो अशाचप्रकारे सुरु राहणार आहे”, असं आदिती तटकरे म्हणाल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
![]()

