नाशिक (प्रतिनिधी): कोपरगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत नागपूर मुंबई रस्त्यालगत दहेगाव शिवारात उत्तमनगरमधील तरुणाचा मृतदेह आढळून आला. अभिजित राजेंद्र सांबरे (वय ३८) असे त्याचे नाव आहे.
या घटनेने सांबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सिडको परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिजितचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागपूर-मुंबई राज्य महामार्गालगत दहेगाव बोलका शिवारात रस्त्याच्या कडेला झाडाखाली एका तरुणाचा मृतदेह बेवारस स्थितीत बुधवारी दुपारी आढळून आला. याबाबत कोपरगाव पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी केली असता मृतदेहाच्या खिशात आधारकार्ड आढळून आले. त्यावरून पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविली.
पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. मृत अभिजित सांबरे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
याप्रकरणी कोपरगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आत्महत्या किंवा अपघाताची शक्यता फेटाळून लावली आहे. घातपात झाल्याच्या शक्यतेच्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790