नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकसह नगर जिल्ह्यातून जायकवडीला पाणी सोडण्यावरून सुरू असलेला वाद मुंबई हायकोर्टात गेला असून दोन्ही बाजूकडील पक्षांकडून वाद सुरू झाला आहे. यावर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (दि. ७ नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नाशिक-मराठवाडा पाणी संघर्ष पेटण्याची चिन्हे असून नाशिकहून जायकवाडीला सोडण्यात येणाऱ्या पाण्याला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नाशिकमधे दुष्काळी परिस्थिती असताना पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली. याच याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नाशिकमधील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय तुंगार आणि भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या 31 ऑक्टोबर रोजी हे पाणी सोडण्यात येणार होते. मात्र नाशिकच्या शेतकऱ्यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी यास विरोध दर्शवत दारणा आणि गंगापूर धरणांतून पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.
मृत साठा वापरावा: जायकवाडीतील मृत साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी द्यावी आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, यासाठी ही याचिका आहे. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने याचिका सुनावणीसाठी घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, आज सुनावणीसाठी ही याचिका येणार आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने सध्या अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली असून, टँकरची मागणी वाढत आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील निर्माण होण्याची शक्यता असल्याने पाणी सोडण्यास विरोध होत आहे.