नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): उद्यापासून म्हणजेच ३० डिसेंबरपासून सुरू होत असलेली जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस नाशिकहून मुंबईला अवघ्या ३ तास १७ मिनिटांत पोहोचणार असल्याने या मार्गावरील ती सर्वात वेगवान रेल्वेगाडी ठरणार आहे. शिर्डी-मुंबई वंदेभारतपेक्षा नाशिक-मुंबई अंतरातील नव्या वंदे भारतचा रनिंग टाईम सहा मिनिटांनी कमी आहे.
मात्र मुंबईहून नाशिकला पोहोचण्यासाठी मुंबई-शिर्डी वंदे भारतला अवघे २ तास ३७ मिनिटे लागतात तर मुंबई-जालना वंदे भारतला हेच अंतर कापण्यासाठी तब्बल ३ तास १८ मिनिटे लागणार आहेत.
नव्याने सुरू होणारी जालना-मुंबई वंदे भारत नाशिकहून सकाळी ८.३८ वाजता मुंबईकडे निघून ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचणार आहे. त्यामुळे सकाळी मोठ्या संख्येने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्यांची चांगली सोय होणार आहे.
त्याच प्रमाणे येतानाही ही गाडी दुपारी १.१० वाजता सीएसएमटीहून निघेल आणि ४.२८ वाजता नाशिकला पोहोचेल. नाशिक-मुंबईसाठी आतापर्यंतची सर्वात सुपरफास्ट ठरलेल्या या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शनिवारी सकाळी ११:४५ वाजता छत्रपती संभाजी नगर रेल्वेस्थानकावर होणार आहे.
…अशी आहे नवी ‘वंदे भारत’ ट्रेन:
शुक्रवार व्यतिरिक्त आठवड्यातून सहा दिवस दररोज धावणारी १६ बोग्या असलेली वंदे भारत ट्रेन मराठवाडा ते मुंबई अशी कनेक्टिव्हिटी ताशी १३० कि.मी. वेगाने धावणारी सुपरफास्ट ट्रेन आहे. ही ट्रेन जालन्यावरून सुटल्यानंतर संभाजीनगर, मनमाड, नाशिक, ठाणे या स्थानकांवर प्रत्येकी दोन मिनिटे थांबणार आहे.