नाशिक (प्रतिनिधी): जाहिरात बनविण्यासाठी आलेल्या वाहनांवर जीएसटी न लावता सोडून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जगदीश पाटील याच्याकडे ४५ लाखांची मालमत्ता आढळून आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. ४) रात्री पाथर्डी फाटा येथील विक्रीकर भवन येथे पाटील यास रंगेहाथ अटक केली. त्यास न्यायालयाने बुधवार (ता. ६)पर्यंत एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जगदीश सुधाकर पाटील, असे संशयित जीएसटी अधिकाऱ्याचे नाव आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ५) गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात हजर केले असता, त्यास बुधवार (ता. ६)पर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार हा मुंबईतील जाहिरात व्यावसायिक आहे. टाटा कंपनीने नुकतेच एक नवीन वाहन बाजारात आणले असून, त्याची जाहिरात करण्यासाठी तो नाशिकमध्ये आला होता.
त्याचवेळी जाहिरात करण्यासंदर्भातील आवश्यक परवाने व शासकीय शुल्क भरण्यासाठी तक्रारदार राज्य कर विभागात गेला असता, पाटील यांनी या तक्रारदार व्यावसायिकास ‘तुमचे पाच ते सहा लाखांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, ते होऊ देत नाही’, असे म्हणून चित्रीकरणासाठी आलेली नवीन वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिली.
त्या मोबदल्यात पाटील यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, सोमवारी (ता. ४) रात्री कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत पथकाकडून घरझडती:
लाचखोर पाटील याच्या घराची झडती लाचलुचपतच्या पथकाने घेतली असता, एकूण ४५ लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता हाती लागली आहे. अद्यापही झडती व बँक खाते तपासले जात असून, आढळलेल्या कागदपत्रांद्वारे इतर मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. मालमत्ता कुठे व किती आहे, जमीन, दागिने, प्लॉट, वाहने इतरही बाबींचा शोध पथकाकडून घेतला जात असल्याची माहिती ‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी दिली.