नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): मिड टर्म ISOT या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेचे नाशिक मध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी हॉटेल रॅडिसन ब्लू, नाशिकमध्ये होणार आहे. भारतातील अवयवादानाचे प्रमाण खूपच कमी आहे व त्या मानाने अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता खूप आहे.
लोकांच्या मनात अवयव दानाबद्दल बरेच समज गैरसमज आहेत, त्यामुळे एखाद्या मेंदू मृत व्यक्तीचे अवयव दान नातेवाईक करू शकतात हे जेव्हा डॉक्टर रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम क्षणी समजावून सांगत असतात त्यावेळी त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि ते अवयव दान करण्यास नकार देतात. या अवयव दानातून कमीत कमी सहा जणांना अवयव मिळून नवीन आयुष्य मिळू शकतं. पण अवयवदान करण्यास टाळाटाळ केली जाते, भारतात अवयवादानाचे प्रमाण वाढावे उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेसाठी शिकागो विद्यापीठातून प्रो.डॉ. जॉन फंग येणार असून ते लिव्हर प्रत्यारोपणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुबई येथून प्रो. डॉ. मारिया गोमेज येणार असून त्या अवयवादानात येणाऱ्या अडथळ्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. नोटो या शासकीय संस्थेचे मुख्य संचालक प्रो.डॉ. अनिल कुमार हे भारतातील कसे वाढवता येईल यावर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी भारतातून 300 हून अधिक अवयव प्रत्यारोपण तज्ञ सहभागी होणार आहेत. अवयव दानामुळे समाजाला कसा फायदा होईल याबाबत विचार मंथन होणार आहे.
अवयव प्रत्यारोपण करताना काही अवयवदात्यांचे अवयव कधीकधी थोडे संशयास्पद, म्हणजेच कधी इन्फेक्शन असतं तर कधी रक्तातील क्रिएटिनिन वाढलेला असतं, अशावेळी निर्णय घेण्याकरिता वेळ अगदी कमी असतो. यावेळी कोणत्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे अवयवदात्यांचे अवयव घ्यावे, याबाबत चर्चासत्र होऊन त्यावर ISOT या भारतीय संस्थेतर्फे या परिषदेचा सारांश म्हणून मार्गदर्शनपर स्टेटमेंट तयार केले जाणार आहेत.
या वेळी ISOT चे अध्यक्ष डॉ. अनिल श्रीवास्तव, सचिव डॉ. मनीष बलवानी आणि आंतरराष्ट्रीय प्रत्यारोपण परिषदेकडून डॉ. विवेक कुटे उपस्थित राहणार आहेत यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा फायदा होईल आणि अवयवदानाच्या आव्हानात्मक प्रक्रियेमध्ये सुलभता येईल, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. देवदत्त चाफेकर सचिव डॉ. मोहन पटेल, खजिनदार डॉ. नागेश अघोर, सह सचिव डॉ. देवीकुमार केळकर यांनी दिली. याप्रसंगी नेफ्रॉलॉजी फोरम ऑफ नाशिक या संस्थेचे डॉ. विजय घाडगे, डॉ. किशोर वाणी, डॉ. कैलास शेवाळे हे उपस्थित होते.