नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): एमडी ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) यास पुणे पोलिसांनी गुरुवारी (ता. २) तपासकामी नाशिकमध्ये आणले होते. पुणे पोलिसांकडून याबाबत अतिशय गोपनीयता पाळण्यात आली होती.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या हाती आणखी काही ऐवज लागल्याचे समजते.
पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज विक्री करणारा ललित पाटील पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. ललितला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली होती. मुंबई पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला.
ससून रुग्णालयातून ललितने पलायन केल्यावर तो नाशिकमध्ये आला असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. त्याची प्रेयसी प्रज्ञा कांबळेकडून २५ लाख रुपये घेऊन तो चेन्नईला गेला होता. याच संदर्भात तपासकामी पुणे पोलिसांनी ललितला गुरुवारी नाशिकमध्ये आणले.
ललितच्या दोन साथीदारांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून आठ किलो सोन्याच्या विटा व काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. ललितला चाकण ड्रग्ज कारखान्याच्या प्रकरणात अटक झाल्यावर भूषण पाटील याने व्यवसाय सांभाळला. त्यातूनच त्यांनी शिंदे गावात कारखाना सुरू केला होता.
याच तपासाच्या अनुषंगाने ललितला गुरुवारी नाशिकमध्ये आणण्यात आले होते. नाशिक रोड परिसरातील ललितच्या घरी तसेच त्याची प्रेयसी प्रज्ञा हिच्या घरी नेऊन तपास करण्यात आल्याचे समजते. तपास अधिकारी व सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्यासह पुणे शाखेचे पथक उपस्थित होते.