नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): राजधानी दिल्लीत पोहोचण्यासाठी आता नाशिककरांना हवाई सेवेचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर इंडिगो लाइन्सकडूनही ओझर विमानतळावरून रोज नियमित दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रदिनी ओझर विमानतळावर सेवेचे उदघाटन झाले.
या विमानाचे सकाळी ९.२० ला ओझर विमानतळावरून उड्डाण होईल. अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ते दिल्लीला पोचेल. उदघाटन सोहळ्यास इंडिगोचे व्यवस्थापक सुब्रता मंडल, साकेत चतुर्वेदी. मुख्य कार्यकारी अधिकारी कॅ. प्रवीण गायकवाड, पंकज दराडे, एअरपोर्टचे संचालक विलास आव्हाड, नितीन सिंग तसेच निमा एव्हिगेशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावळ उपस्थित होते.
दिल्ली विमानतळावरून ओझर येथे आलेल्या इंडिगो विमानाचे पाण्याचे फवारे मारून स्वागत करण्यात आले. इंडिगोतर्फे सध्या नागपूर, इंदूर, गोवा, हैदराबाद, अहमदाबाद अशा थेट सेवा सुरू आहेत. यापाठोपाठ आता ‘नॉन स्टॉप’ दिल्ली ही सेवा सुरू झाली. नाशिककरांची अनेक दिवसांपासून दिल्ली सेवा सुरू करण्याची मागणी होती. १ मेस महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिककरांच्या सेवेत इंडिगोने सेवा दाखल केली. ७२ आसनव्यवस्थेचे हे विमान रोज ओझर विमानतळावरून उड्डाण करणार आहे.
अशी आहे विमानाची वेळ:
दिल्ली: सकाळी ६. ५५ वा. (टेकऑफ)
नाशिक: सकाळी ८. ५० वा. (लँडिंग)
नाशिक: सकाळी ९. २० वा. (टेकऑफ)
दिल्ली: सकाळी ११. ५५ वा. (लँडिंग)