रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच रेल्वे प्रशासनाने आता ट्रेनच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीत वाद होणे, महिला प्रवाशांच्या बाबतीत गैरप्रकार घडणे, प्रवासादरम्यान चोरी, अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने हे नवीन पाऊल उचलले आहे.
सध्या प्रायोगिक स्वरूपात काही डब्यांत सीसीटीव्ही बसवले जाणार असून त्याचा सकारात्मक परिमाण सर्व डब्यांत टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये आणि 15000 इंजिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेल्वेची आता प्रत्येक डब्यात डिजिटल निगराणी असणार आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ दोन कॅमेरे असतील. तसेच प्रत्येक डब्यामध्ये 4 डोम प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. एक पुढील बाजूस, एक मागच्या बाजूस आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक अशा प्रकारे प्रत्येक इंजिनमध्ये 6 सीसीटीव्ही असतील.
24 तास आधीच कळणार तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही:
भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधीच मिळणार आहे. यापूर्वी फक्त 4 तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जात असे, त्यामुळे वेटिंग तिकिटधारकांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र आता नवीन निर्णयाचा लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.हा नवा नियम लवकरच देशभर लागू केला जाणार आहे. तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तत्काळ तिकिटे पूर्वीप्रमाणे प्रवासाच्या एक दिवस आधीच बुक करता येतील व त्यांची कन्फर्मेशन प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.
वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी आले कठोर नियम:
रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी काही कठोर नियम लागू केले आहेत. वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. अशा प्रवाशांनी फक्त जनरल कोचमधूनच प्रवास करता येईल. जर कोणी वेटिंग तिकीट घेऊन एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करताना सापडले तर त्याला दंड आकारण्यात येईल.
तिकिटास दोन श्रेणीपर्यंतच अपग्रेड करता येणार:
आता स्लीपर क्लासच्या तिकिटाला फक्त दोन श्रेणीपर्यंतच अपग्रेड करता येईल. स्लीपर क्लासचे तिकीट जास्तीत जास्त थर्ड एसी किंवा सेकंड एसीपर्यंतच अपग्रेड करता येईल, फर्स्ट एसीपर्यंत नाही. त्याचप्रमाणे, थर्ड एसीचे तिकीट जास्तीत जास्त फर्स्ट एसीमध्येच अपग्रेड करता येईल.