येत्या दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव कमी होणार, आगामी मान्सून सर्वसाधारण राहण्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी): आगामी मान्सून हंगामासाठी सकारात्मक बाब आहे. आगामी मान्सून हंगामात पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी मान्सून हंगामाच्या आधी महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर येण्याचे संकेत अमेरिकी हवामान शास्त्र संस्था नोआने दिले आहेत. आगामी मान्सून हंगामासाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. एल निनोची शक्यता नसल्याने पाऊस सर्वसाधारण राहील असा अंदाज आहे.

आगामी मान्सून हंगामात पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता:
गेल्या वर्षी एल निनोचा थेट प्रभाव मान्सून काळातील पर्जन्यमानावर झाला. 2023 मध्ये देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाची नोंद झाली होती. तर, महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला आणि अमरावती या नऊ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदला गेला होता. सध्या जानेवारीमध्येच राज्यातील अनेक तालुक्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. एल निनो ओसरून ला निनाची स्थिती आल्यास राज्यात मान्सून दरम्यान सर्वसाधारण ते सरासरीहून अधिक पाऊस पडेल.

येत्या दोन महिन्यामध्ये एल निनोचा प्रभाव ओसरण्याचा अंदाज:
दरम्यान, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यामध्ये एल निनोचा प्रभाव ओसरण्याचा अंदाज आहे. एप्रिल ते जून महिन्यात प्रशांत महासागराचं तापमान न्यूट्रल होण्याची शक्यता 73 टक्के आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यत प्रशांत महासागराचं तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्या भागात ला निना निर्माण होण्याची शक्यता 50 ते 60 टक्के आहे. ला निना आल्यास मान्सून काळात सर्वसाधारण ते सरासरीहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

एल निनो म्हणजे काय?:
विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं जात तेव्हा त्याला एल निनो असं म्हटलं जातं. प्रशांत महासागराचं सरासरी तापमानापेक्षा तापमान 0.5 अंश अधिक झाल्यास एल निनोची परिस्थिती निर्माण होते. तापमान 0.5 अंशापेक्षा अधिक झाल्यास जगभरातील वाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे हवामानातही बदल दिसून येतो.

एल निनोचा वातावरणावर परिणाम:
एल निनोमुळे मान्सून काळात बाष्प कमी होतं आणि त्यामुळे मान्सून कमी होतो. याचा परिणाम आधीही आपल्याला दिसून आला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात अपुरा पाऊस झाला. पण, आता एल निनोची स्थिती जाऊन तापमान सर्वसाधारण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही आगामी मान्सूनसाठी दिलासादायक बाब असून राज्यात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790