नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी रोडवरील तलाठी कॉलनी येथे भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाले. याप्रकरणी आरोपी दुचाकीस्वाराला न्यायालयाने दोन वर्षे कारावास आणि ४ हजार १०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दरम्यान, या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार असलेले वैद्यकीय अधिकारी व तपासी पोलीस अधिकारी यांची ऑनलाईन साक्ष घेण्यात आली होती.
शेहजाद रेहमान खान (२१, रा. शाम चाळ, हरियाली व्हिलेज, टागोरनगर, विक्रोळी, मुंबई ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरचा अपघात २८ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडला होता.
आरोपी दिंडोरी रोडने तारवालानगरकडून निमाणीकडे दुचाकीने (एमएच १५ सीयु ११५२) भरधाव वेगात जात असताना, पदचारी वत्सला बनकर यांना जोरात धडक दिली.
यात त्या मयत झाल्या. तर, आरोपीने जयवंत भारत प्रधान, सीमा शंकर खंडारे यांनाही जोरात धडक दिल्याने जखमी झाले. त्यानंतर आरोपीने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकीलाही (एमएच १५ डीएच ८९३१) धडक देत नुकसान केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक एस.जी. जगदाळे, एस. के. म्हात्रे, हवालदार मेटकर यांनी तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील यांच्यासमोर खटला चालला.
तर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता श्रीमती सुनिता चितळकर यांनी आठ साक्षीदार तपासले. यावेळी खासगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक दाधिच यांची दुबई तर, तपासी पोलीस उपनिरीक्षक एस.जी. जगदाळे यांची मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे साक्ष सरकार पक्षातर्फे घेण्यात आली.
आरोपी दोषी आढळून आल्याने न्यायालयाने त्यास दोन वर्षे साधा कारावास व ४ हजार १०० रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एम.ए. खंबाईत, महिला पोलीस पी.पी. गोसावी यांनी पाठपुरावा केला.
“या खटल्यामध्ये साक्ष नोंदविताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करणारे तपासी पोलीस अधिकारी जगदाळे यांची मुंबईला बदली झाल्याने आणि डॉ. दाधिच हे दुबईमध्ये असल्याने या दोघांची ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष घेतली.”
– ॲड. सुनिता चितळकर, विशेष सरकारी अभियोक्ता, जिल्हा न्यायालय