नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात सर्व दुकाने उघडणार असल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. मात्र या सर्व चर्चांवर आता पूर्णविराम लागला आहे. सरसकट सर्व दुकाने सुरू होणार नसून अधिसूचना मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकल दुकाने निवासी कॉलनीमधील अंतर्गत दुकाने अशा स्वरूपाशी दुकाने सुरू होऊ शकतात परंतु त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. त्यानुसार शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार सुधारित अधिसूचना जिल्ह्यासाठी लागू करण्यात आलेली आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत या शहरी भागातील मॉल्स, कॉम्प्लेक्स स्वरुपातील मार्केट बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशान्वये दिली आहे.
कंटेनमेंट झोनमधील दुकानासंदर्भात नवीन अधिसूचनेत कोणताही बदल नसून पूर्वीप्रमाणेच तेथे केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहतील. तथापि रेडझोन व ऑरेंज झोन या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या शिवाय अधिसूचनेमध्ये विषद केलेल्या स्वरूपाची अन्य दुकाने देखील सुरू करता येतील. सरसकट सर्व दुकाने सुरू होणार नसून अधिसूचना मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकल दुकाने निवासी कॉलनीमधील अंतर्गत दुकाने अशा स्वरूपाशी दुकाने सुरू होऊ शकतात परंतु त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य आहे. मालेगाव शहराबाबत शासनाने सदर अधिसूचनेत स्वतंत्र उल्लेख केला असून त्या महानगरपालिका क्षेत्रात मात्र एका रांगेमधील पाच पेक्षा अधिक दुकाने असल्यास केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील व पाच पेक्षा कमी दुकाने असल्यास सर्व दुकाने सुरू राहतील असे नमूद केले आहे. अर्थात कंटेनमेंट झोनमध्ये मात्र केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने विहित वेळेत सुरू राहणार असल्याचेही मांढरे यांनी कळविले आहे.
नियमांचे पालन करून व्यवसाय करावा
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेली अधिसूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सर्व प्रसारमाध्यमांना देखील पाठवण्यात आलेली आहे. त्या अधिसूचनेचे व्यवस्थित वाचन करूनच दुकान उघडण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकान मालकांनी आपल्या दुकानात सॅनिटायर्झचा वापर करावा. तसेच प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक आहे. एका वेळी दुकानात पाच व्यक्तींनाच प्रवेश असून, त्यातही सुरक्षित वावर ठेवणे आवश्यक आहे. दुकानदारांनी या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मांढरे यांनी सांगितले आहे.