नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेला आर्थिक पुरवठा (फंडिंग) केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताविरोधात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याचे समजते.
नाशिकमधून अटक केलेल्या संशयिताच्या एटीएस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यास उद्या (ता. ३१) विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. एटीएसच्या हाती नेमके काय पुरावे लागले आहेत, याकडे आता लक्ष लागून आहे.
हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०, रा. एमराल्ड रेसीडेन्सी, बाजीराव नगर, तिडके कॉलनी, नाशिक) असे इसिसच्या संपर्कात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
हुजेफ यास गेल्या २३ तारखेला तिडके कॉलनीतील राहत्या घरातून एटीएसने अटक केली होती. न्यायालयाने त्यास ३१ तारखेपर्यंत कोठडी सुनावली होती.
या दरम्यान, एटीएसची काही पथके परराज्यात चौकशीसाठी रवाना करण्यात आली होती. संशयित हुजेफ हा व्यावसायिक असला तरी, तो इसिसच्या संपर्कात असलेल्या पाकिस्तानी महिला राबिया उर्फ उम्म ओसाबा हिच्या संपर्कात आला होता.
तिच्याच सांगण्यावरून त्याने २०१९च्या धर्म युद्धात मारले गेलेल्यांच्य कुटूंबियांना हुजेफ याने आर्थिक मदत केल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले होते. महाराष्ट्रासह बिहार, तेलंगणा व कर्नाटकातून ऑनलाईन आर्थिक व्यवहार केल्याचे पुरावेही न्यायालयासमोर ठेवले होते.
यासाठी एटीएसची काही पथके या राज्यांमध्ये तपासाकामी रवाना करण्यात आली होती. या पथकांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागल्याचे सांगितले जाते.
तसेच, त्याच्या घरझडतीतून हाती लागलेले लॅपटॉप, मोबाईल, सीमकार्ड, पेनड्राईव्ह यांचीही तपासणी करण्यात आली आहे. चौकशीमध्ये हाती लागलेल्या पुराव्यांची माहिती आज (ता. ३१) न्यायालयात दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे लक्ष लागून आहे.