नाशिक (प्रतिनिधी): चाळीसगाव येथील बम्बईया व हैदर टोळीमध्ये मागील काही दिवसांपासून गँगवार रंगत आहे. यातील हैदर टोळीच्या काही सदस्यांनी बुधवारी (दि.०५) रात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील द्वारका परिसरात आले असता भद्रकाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे…
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदर टोळीचा मोरक्या शोएब शेख हा तडीपार असून इतर संशयित हे हिस्ट्रीशीटरआहेत. काल रात्री दीड वाजेच्या सुमारास हैदर टोळीचे काही सदस्य द्वारका परिसरात आल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह पथक द्वारकाजवळील त्रिकोणी गार्डन येथे पोहोचले.
यावेळी पोलिसांना पाहताच हैदर टोळी तिथून पसार होण्याच्या तयारीत असताना सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी स्विफ्ट कार (क्रमांक एमएच ३ डीएक्स ७७११) या वाहनाचा पाठलाग करून विशाल ओमप्रकाश राजभर (वय ३० वर्ष रा. डेअरी एरिया, हिरापुर रोड, चाळीसगाव, जि. जळगाव), अजय हिरामण राठोड (वय १९ वर्ष, रा. नागद रोड, आठवडे बाजार, चाळीसगाव जि. जळगाव), शोएब अस्लम शेख (वय २५ वर्ष, रा. नागद रोड, आठवडे बाजार, चाळीसगाव जि. जळगाव), दानिश रशिद मनियार, (वय २२ वर्ष, रा. नयागाव, इस्लामपुरा, चाळीसगाव, जि. जळगांव) व नुरुद्दीन शरिफुद्दीन शेख (वय २७ वर्ष रा. हुडको कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच हे सर्वजण हैदर टोळीमधील असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी या संशयित आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतूस, धारधार कोयत्यासह इतर हत्यार हस्तगत केले. तसेच याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. तसेच तपासात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.